जी.एस्. आमोणकर विद्यामंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

जी.एस्. आमोणकर विद्यामंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

दिनांक २ ऑक्टोबर रोजी शाळेत गांधी जयंती साजरी करून नंतर प्राथमिक विभागाच्या दोन शिक्षिका सौ. अपर्णा देसाई व श्रीमती आनंदी कामत यांच्यासाठी सेवानिवृत्तीपर कार्यक्रम ठेवण्यात आला होता. “माता आणि माती फरक आहे वेलांटीचा, एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते.” असे बोलत सौ. दीपाली नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तद्नंतर प्रार्थना व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या कमिटीचे अध्यक्ष अॅड. संजय उसगांवकर यांनी दोन्ही शिक्षिकांबद्दल आपले विचार मांडताना म्हटले की त्या दोन्ही शिक्षिकांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने व मायेच्या स्पर्शाने आपली यशस्वी कारकीर्द घडवली आहे. नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गायत्री सिरसाट यांनी आपले विचार मांडत असताना म्हटले की, जसा एक माळी रोपट्यांना खत-पाणी घालून त्याची व्यवस्थित निगा राखून, त्याचे पालन पोषण करतो, तसाच शिक्षकही विद्यार्थ्यांबाबत तीच भूमिका साकारत असतो.
शाळेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री. राज आमोणकर, व्यवस्थापक श्री. मोहन कौल, सदस्य श्री. गुरुदास भक्ता, पालक शिक्षक संघाचे सदस्य श्री. विजय भिके व शाळेच्या शिक्षक वर्गापैकी काही शिक्षकांनी प्राथमिक विभागाच्या सत्कार मूर्तींबद्दल आपले मनोगत व्यक्त करत म्हटले की, कोणत्याही शाळेचा पाया प्राथमिक विभागाच्या शिक्षकांमुळे भक्कम होत असतो.
तद्नंतर सत्कार समारंभ आरंभ करण्यात आला. मान्यवरांच्याहस्ते सौ. अपर्णा देसाई व श्रीमती आनंदी कामत यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन पुन्हा एकदा शाळेत सत्कार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही शिक्षिकांनी आपल्या शाळेतील सुंदर आठवणींना उजळणी देत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी २०१०-११ या सालच्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले. शेवटी सौ. सावित्री घाडी यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.